माणिकपुंज चे पाणी वाचवण्यासाठी सर्वपक्षीय रेट्याची गरज.!

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता आज देणार निवेदन ; पाणी रोखण्यासाठी सर्वपक्षीय रेट्याची गरज.!
                  
                नांदगाव-: संतोष कांदे
दुष्काळी परिस्थितीतही पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या माणिकपुंज धरणाकडे जळगाव जिल्ह्याची वक्रदृष्टी पडल्याने हे पाणी पळविण्याच्या दृष्टीने 'वजनदार' हालचाली सुरू झाल्या आहेत.तर तालुक्यातील नेते मात्र शांत असल्याने आगामी निवडणुकीत मते कुठल्या मुद्द्यावर मागणार.? असा प्रश्न चर्चेला आला आहे.
       दि.६ एप्रिल १९९९ मध्ये २८.७७ कोटी रुपये खर्चाच्या माणिकपुंज धरण बांधकामास तापी पाटबंधारे विकास महामंडळ (जळगाव जिल्हा) च्या मुख्य अभियंत्यांनी मंजुरी दिली होती.प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानंतर प्रथम सुधारीत मान्यता म्हणून १८ फेब्रुवारी २००९ रोजी ५१.९२ कोटी रुपये मंजूर होऊन धरण पूर्णत्वास जाऊन बऱ्यापैकी पाणीसाठा होऊ लागला होता.मात्र या धरणात वनविभागाचे ११.०२ क्षेत्र असल्याने या धरणाच्या सांडव्याचे काम तब्बल १० वर्ष रखडले होते.माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने निफाड तालुक्यातील सावरगाव येथील पर्यायी जमीन देण्यात आल्यानंतर रखडलेले काम पूर्ण करण्यात आले.एकूण २६८५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते,त्यात नांदगाव तालुक्यातील २३१० तर चाळीसगाव तालुक्यातील फक्त ३७५ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता.मात्र तेथील 'वजनदार' नेत्यांनी हा आकडा वाढवत ६८५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा घाट घातला आहे.म्हणजेच प्रत्यक्षात मंजूर क्षेत्रात दुपटीने वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी चाळीसगांव तालुक्यातील पिंपळगाव,राजदेहरे,घोडेगाव,या तीन गावांना कालवा सिंचनाचा लाभ होणार होता,मात्र त्यात आता वाढ करून आठ गावांचा समावेश झाल्याचे वृत्त आहे,त्यात हातगाव, करंजगाव,तांबाळे, रोहिणी,चितेगाव,शिंदी,ओंढरे,आदी गावांतील शेतीचा समावेश झाल्याची माहिती आहे.
      या धरणासाठी तालुक्यातील जळगाव बुद्रुक,माणिकपुंज,गणेशनगर,पोही,कसाबखेडा, कासारी, आदी गावांतील सुमारे ४९५ एकर क्षेत्र संपादित करण्यात आले आहेत.मात्र त्या तुलनेत तितके ही क्षेत्र कालवा सिंचनातून ओलिताखाली आणण्यात आलेले नाही.रब्बी हंगामातही ८६.२२ दशलक्ष घनफुट पाणी देवून ४६७ हेक्टर क्षेत्राचे सिंचन केले जाते,मात्र त्याला यंदाचे वर्ष दुष्काळामुळे अपवाद ठरले आहे.
       दरम्यान हे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीच असावे,यासाठी आंदोलनाची सर्वप्रथम तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी केली आहे.आज (दि.२४) रोजी ते तहसीलदार श्रीमती भारती सागरे यांना या संदर्भातले निवेदन देणार आहेत.या एकमेव धरणाचे पाणी वाचवण्यासाठी पक्षीय जोडे बाहेर काढून सर्व पक्षीय रेट्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक