सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या जवानाचा असा ही एक आदर्श.!
नांदगाव-: संतोष कांदे
देशाच्या सीमेवरच देशसेवा करता येते,असे नाही देशात ही विधायक काम करून देशसेवेचे ऋण चुकवता येते.! असा आदर्शवत संदेश तालुक्यातील भालूर येथील मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात जवान विलास मडके यानी दिला आहे.
गंभीर पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये भालूर गावाचा अग्रक्रम लागतो.रोज नव्याने उगवणाऱ्या सूर्याच्या अगोदर पाण्याचा शोध येथील महिलांना,पुरुषांना व बालकांना घ्यावा लागतो.त्यात ही पाणी मिळेलच याची शास्वती अनेक वेळा नसते.मात्र अशा परिस्थितीत दिलासा देणाऱ्या घटना समाजमनाला उभारी देत असतात.जगण्याच्या लढाईला बळ प्राप्त करून देत असतात.अगदी याच साच्यात घट्ट बसेल अशी घटना नुकतीच दृष्टीक्षेपात आली.
सैन्यदलातील जवान येथील विलास चंद्रकांत पाटील मडके हे सध्या सुट्टीवर गावी आले आहेत. त्यांनी गावालगत आपल्या शेतात बोअरवेल करण्याचा विचार केला.आणि तो अंमलात ही आणला,आणि सुदैवाने त्या बोअरवेलला चांगले पाणी लागले.मात्र यावर शेती बागायती करण्याचा विचार त्यागून त्यांनी सदस्थितीत गावातल्या पाणीटंचाईचा विचार केला.व या देशभक्त जवानांने गावातील लोकांना पाणी मोफत देण्याचे ठरवले.
ग्रामपंचायतीने तात्काळ चार हजार लिटर पाण्याची टाकी त्याठिकाणी पोहोच करून दिली त्यामुळे परिसरातील काही लोकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यांच्या या कार्यामुळे देशसेवेबरोबर जनसेवा त्यांच्या हातून होत असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे यावेळी जवान विलास मडके यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते पूजा करून श्रीफळ वाढविण्यात आले.
यावेळी सरपंच संदीप आहेर,दिगंबर निकम,संजय निकम,विलास आहेर,बाबासाहेब आहेर,भागवत पाटिल, चंद्रकांत मडके,अशोक निकम, सुदाम मडके,सुरेश मडके,सुनील पवार,गोरख बागुल आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment