राजरंग नांदगावचे...! विशेष राजकीय वृत्त
नांदगाव-: संतोष कांदे
थेट महाराष्ट्र राज्याला पहिला मुख्यमंत्री देण्याचा मान नांदगाव तालुक्याला मिळाला असता ; पण थोडक्यात हुकला.तरीही राज्य शासनाचे दोन नंबरचे समजले जाणारे पद म्हणजे महसूल.! पहिला महसूलमंत्री नांदगाव तालुक्याने दिला होता,कै. भाऊसाहेब हिरे यांच्या रूपाने हे भूषणावह होय.!
१९५६ मध्ये कुळकायदा अस्तित्वात आणलेल्या कै. हिरे यांनी राज्याच्या सत्ताकारणात महत्वाची भूमिका बजावली.अशा महान नेत्याचा हा मतदारसंघ होता.कै. भाऊसाहेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कै. व्यंकटराव यांनी १९६७ पर्यंत या तालुक्याची धुरा सांभाळली.मात्र या वर्षात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू कै. शिवराम हिरे यांनी कै. व्यंकटराव हिरे यांचा पराभव करत आमदारकी पटकावली.आणि या निवडणुकीचे वैशिष्ट्ये अशी की,तुरुंगात असताना आमदार झालेले त्या काळातील कै. शिवराम हिरे हे पहिलेच.!
त्यानंतर मनमाडच्या कै. हिरुभाऊ गवळी यांनी १९७२ ते ७८ मध्ये तालुक्याची आमदारकी भूषवली.७८ मध्ये तालुक्याच्या घाटमाथ्यावरील कै.कन्हूशेठ नहार यांनी सर्व जाती-समाजाची मोट बांधत चक्क अपक्ष उमेदवारी करत आमदारकी पटकावली.स्वतःच्या समाजाची बोटावर मोजता येतील,इतकी ही मते नसलेल्या कै. नहार यांनी आमदारपदी विराजमान होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले,मात्र त्यांची ही आमदारकी अवघी दोन वर्षे टिकली.कारण याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले.आणि त्यांच्या या सरकारची कमान येवल्याचे आमदार जनार्दन बोडके पाटील (जनुभाऊ) व नांदगावचे (कनूभाऊ) या दोघांवरच होती.किंबहुना त्यांच्यामुळेच हा प्रयोग शक्य झाल्याचे खासदार शरद पवार आजही म्हणत असतात.या दोन वर्षांच्या काळात कै. नहार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ उदघाटन,भूमीपूजन निमित्ताने तालुक्यात आणले होते.
१९८० मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यानंतर जी निवडणूक झाली,काँग्रेस पक्षाने मनमाड शहरातील व्यवसायाने वकील असलेल्या जगन्नाथ धात्रक या तरुण कार्यकर्त्याला संधी दिली.कोरी पाटी अन सर्वांशी जुळवून घेण्याची सवय असलेले अँड.धात्रक ३२ हजार ४७३ मते मिळवत तालुक्याचे आमदार झाले.१९८५ च्या निवडणुकीत मात्र इतिहास घडला.१९७२ पासून मार्क्सवादी पक्षाच्या तिकिटावर नशीब आजमावत असलेले कै. माधवराव गायकवाड यांची प्रतीक्षा फळास आली.व ते २५ हजार ७३५ मते मिळवत आमदार झाले.
नुकतेच कालवश झालेल्या माजी आमदार कै.कॉ. गायकवाड यांच्यामुळे ५६ खेडी योजना साकार होऊ शकली.
१९९० मध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा जगन्नाथ धात्रक उमेदवारी बहाल केली.१९८५ मध्ये २२ हजार ५०० मते मिळूनही पराभूत झालेले अँड.धात्रक ९० मध्ये मात्र फक्त २० हजार ४०६ मते मिळवत दुसऱ्यांदा आमदार झाले.आणि याच निवडणुकीपासून 'शिवसेना' या नव्या विरोधकाची भर पडली.या निवडणुकीत शिवसेनेच्या अशोक रसाळ यांनी १६ हजार ३६० मते मिळवत दुसरा क्रमांक घेतला होता.आणि त्यामुळेच की काय,१९९५ मध्ये शिवसेनेचे राजेंद्र देशमुख ३५ हजार ७८६ मते घेऊन आमदार झाले.राष्ट्रद्रोही मुस्लिम विरोधी अशी भूमिका घेऊन जन्म झालेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला प्रथमच विजयी होताना 786 या आकड्याची मदत झाली होती.हे विशेष होय.!
आज संपूर्ण तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेले माणिकपुंज धरण शेतकऱ्यांसाठी अमूल्य भेट आमदार देशमुख यांनी दिली.१९९० मध्ये अवघ्या २० हजार मतांमध्ये आमदार आमदार झालेले धात्रक ९५ मध्ये २५ हजार ५६४ मते मिळवूनही पराभूत झाले.१९९९ मध्ये काँग्रेसने ताज्या दमाचे व नुकतेच जिल्हा परिषदचे अध्यक्ष होऊन गेलेल्या अँड.अनिल आहेर यांना उमेदवारी दिली.जिल्हा परिषद अध्यक्षपदाची कारकीर्द चांगल्या अर्थाने गाजवलेल्या अँड.आहेर यांनी ३५ हजार मते मिळवत आमदारकी ही हस्तगत केली.त्यांच्याच काळात माणिकपुंज धरणाचे काम,उड्डाणपूल,न्यायालय इमारत यासह शंभर कोटींची कामे केली.मात्र सलग आमदार होत नसल्याचा इतिहास ते ही मोडू शकले नाही.३५ हजार मते मिळवून आमदार झालेले अँड.आहेर २००४ च्या निवडणुकीत ४३ हजार मते मिळवूनही पराभूत झाले होते.त्यांना शिवसेनेच्या चौथी पास संजय पवार यांनी धूळ चारली हे विशेष होय.!
२००९ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ थेट दिल्ली दरबारी जाऊन पोहचला,आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने उचलला.सिन्नर मतदार संघ काँग्रेसला देवून, नांदगाव राष्ट्रवादीने घेतला.आणि राज्याचे हेविवेट नेते आमदार छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांना उमेदवारी बहाल केली.शिवसेना वगळता सर्वच पक्ष व नेत्यांनी कंबर कसून पंकज भुजबळ या राष्ट्रवादीच्या
(बाहेरच्या) उमेदवाराला अवघ्या २१ दिवसात आमदार बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला.
( पूर्वार्ध )
Comments
Post a Comment