साठेअप्पा....एक धगधगते व्यक्तिमत्व.!

             नांदगाव-: संतोष कांदे
कायम स्वाभिमान जागृत,मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाला शक्य होईल तितकी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न,आणि निसर्गावर भरभरून प्रेम करणारे जळगाव बुद्रुकचे माजी सरपंच देवराम (साठे अप्पा-८६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
          उद्धटपणे वर्तन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अंगावर हातातली फाईल फेकून,नोकरीला रामराम करणाऱ्या स्वाभिमानी अप्पांनी परत त्याकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही.वडिलोपार्जित शेती करत यशस्वी राजकारण ही केले.ग्रामीण भागातील सर्वोच्च पद म्हणजे सरपंचपद ते ही त्यांनी सहजपणे प्राप्त केले होते.ते वंजारी बहुल गावात.! स्वतःच्या समाजाची बोटावर मोजता येतील इतकी मते नसताना केवळ परोपकारी स्वभावामुळे त्यांना ही किमया साध्य झाली.
        तरुणांना ही लाजवेल असा उत्साह असायचा,शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात नेहमी पुढाकार घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे बहुतांश वेळा त्यांना शेतीत तोटा ही सहन करावा लागला.जळगाव बुद्रुक मध्ये कपाशी ची लागवड करणारे ते पहिले शेतकरी होते.तो पर्यंत गावातील शेतकऱ्यांना कपाशी पिकाबाबत कुठलीही माहिती नव्हती.चार मुली,दोन मुले असे मोठे कुटुंब सांभाळताना काहीवेळा त्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना ही करावा लागला.मात्र त्यांनी हिंमतीने या प्रसंगाला तोंड देत धीराने वाटचाल करत फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत उभारी घेतली.आणि आज गावातील एक सुखवस्तू कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
        राजकारणात ही एकनिष्ठपणा अखेरपर्यंत जपला.न्यायडोंगरीच्या आहेर घराण्याशी त्यांची निष्ठा कायम अबाधित राहिली.आणि काही महिन्यांपूर्वी आहेर घराण्यात घडलेले वादळ त्यांना खूपच वेदना देऊन गेले होते.राजकारणातील त्यांची अचूक माहिती मला माझ्या पत्रकारितेत खूपच मोलाची ठरली.त्यांनी दिलेला सल्ला व माहिती मला माझ्या आयुष्यात सदैव प्रेरणा देत राहील.त्यांना मी माझ्या कुटुंबाकडून भावपूर्ण आदरांजली.!

Comments

Popular posts from this blog

पिनाकेश्वर चे दर्शन घेऊन परतत असताना ट्रॅक्टर दरीत कोसळून दोन भाविक महिला ठार तर १६ जण जखमी.!

सर्पदंश झाला... मात्र शेतातून वाहन जाण्यास रस्ता नसल्याने जीव वाचवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन वाचवला जीव.! तालुक्यात शिवार रस्त्याचा प्रश्न गंभीर...

जळगाव बुद्रुक प्रभाकर सोनावणे यांच्या घरी येथे जबरी दरोडा.. १५ लाखांपेक्षा अधिक रकमेची लूट...आ. कांदे यांचे चुलत शालक