शिवसेनेला विजयाचे श्रेय मिळू नये,म्हणून राष्ट्रवादीकडून मित्रपक्षांचा विश्वासघात.! आ. सुहास कांदे
सा. शनैश्वर टाइम्स वृत्तसेवा
नांदगाव (नाशिक ) संतोष कांदे
महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेने प्रचाराची कमाल उंची गाठली आहे, त्यांच्या विजयात आपला सिंहाचा वाटा असेल.आपसूकच हे श्रेय आपल्याला म्हणजे शिवसेनेला मिळेल. याचा धसका घेऊन मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे लोक तुतारीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. मग विश्वासघातच करायचा असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून केले.
दिंडोरी लोकसभा मतदार क्षेत्रातील महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी आ. सुहास कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदार संघातील साडे सहा जिल्हा परिषद गटातील बूथप्रमुख, शक्तियुथ बूथ प्रमुख, सरपंच,सदस्य,तसेच प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले आहेत.आज साकोरा जिल्हा परिषद गटाचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार श्री. कांदे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते. तर व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती विलासराव आहेर,रमेश बोरसे,
महिला आघाडीच्या नेत्या सौ.अंजुम कांदे,विष्णु निकम, अण्णासाहेब पगार, अनंत इनामदार, सौ. उज्वला खाडे, सौ. श्रद्धा कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती अर्जुन निकम,उपसभापती दीपक मोरे, भाजप तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, माजी सभापती तेज कवडे, राजाभाऊ जगताप आदी उपस्थित होते.
निगेटिव्ह बोलून आपली ताकद कमी करू नका. नसेल मिळाला वेळ... पण आम्ही होतो ना.. तुमच्या सुखदुःखात... भारती ताईंची कमतरता तुम्हाला भासू दिली नाही. आणि म्हणूनच मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य द्यायचे आहे. आणि ह्या विश्वासघाताची कल्पना मी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबाना देणार असल्याचे ही आमदार श्री. कांदे म्हणाले.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना बापूसाहेब कवडे म्हणाले की,निवडणूक देशाची आहे तिला स्थानिक प्रश्नांची जोड देऊन संबंध जोडणे योग्य नाही. कारण कार्यक्षेत्र मोठे असल्याने कामासाठी मर्यादा येतात. तुमच्या कामासाठी सुहास अण्णा इनामदारीने काम करत आहेत. त्यांच्यासाठी ताईंना मतदान करा. ताई खासदार झाल्या तरच मोदी साहेब पंतप्रधान होऊ शकतील. तुतारीचे बटन दाबून तुमची तुतारी वाजवून घेऊ नका.तर सौ.अंजुम कांदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की,एक प्रचलित पद्धत आहे कि, प्रवाहाच्या विरोधात जाऊ नये, ते फायद्याचे ठरत नाही. अण्णांच्या शब्दावर विश्वास ठेवून भारती ताईंना भरघोस मतांनी निवडून देऊ.
या पद्धतीचे मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,विष्णू निकम, दिलीप इनामदार, राजेंद्र पवार, राजाभाऊ जगताप, संजय सानप,अण्णासाहेब पगार, अप्पासाहेब पगार, यांनी व्यक्त केले.
यावेळी मळगाव व हिंगणवाडी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा आमदार सुहास कांदे यांनी भगवी शाल देऊन सत्कार केला.
मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसनेचे नेते, बूथप्रमुख, महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment